गौरवास्पद ! सोलापूर ग्रामीणचे पोलीस हवालदार इक्बाल शेख देणार विदेशात सेवा
सोलापूर – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार इकबाल शेख यांनी आजतागायत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा देशभरात उमटवलेला आहे. याच कामाची दखल विदेश मंत्रालयाने घेतली असून त्यांची मिनीस्ट्री ऑफ एक्सटरनल अफेअर्स, दिल्ली येथील विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे व काही कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करून ते विदेशात सेवा बजावणार आहेत. या कामगिरीने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा गौरव त्यांनी वाढविला आहे. परराष्ट्र मंत्रालयात निवड झालेले सोलापूर ग्रामीण जिल्हयातून ते पहिलेच पोलीस अंमलदार ठरले आहेत.
सन २००३ मध्ये इकबाल शेख पोलीस दलात रुजू झाले. संगणकीय व इतर तांत्रिक ज्ञानाच्या अनुभवामुळे त्यांना स्थानिक गुन्हे शाखा तसेच सीसीटीएनएस विभागात विविध महत्वाच्या कामाकरीता नियुक्त करण्यात आले. सीसीटीएनएस विभाग येथे कर्तव्यावर असताना इकबाल शेख यांनी सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हयास राज्यात अग्रस्थानिच ठेवून वैयक्तिक पदके व राज्यस्तरीय “फिरते चषक” मिळवून दिले आहे. तसेच अनेक कौशल्य स्पर्धांमध्ये सहभाग घेवून परिक्षेत्रिय, राज्यस्तरीय तसेच अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यांमध्ये प्राविण्य मिळवून ११ सुवर्ण, ९ रौप्य, १४ कांस्य पदके, राष्ट्रीय पारितोषिक, पोलीस महासंचालक पदक, ४० पेक्षा जास्त प्रशंसापत्रे पटकाविले आहेत.
विदेश मंत्रालयात अशी झाली निवड –
पोलीस हवालदार इकबाल शेख यांची कामगिरी उत्कृष्ठ होतीच दरम्यान विदेश मंत्रालय, दिल्ली येथे अति वरिष्ठ अधिकारी यांचेकडून त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी अत्यंत प्रभाविपणे व उत्तमरित्या दिलेल्या मुलाखतीमुळे विदेश मंत्रायलयाकडून दखल घेत विशेष प्रशिक्षण व विदेशातील सेवेची संधी त्यांना प्रदान केली आहे. त्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेश प्रभू, तत्कालीन पोलीस अधिक्षक शिरीष सरदेषपांडे, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, पोलीस उपअधिक्षक (गृह) विजया कुर्री, पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे सीसीटीएनएस, सुरेश निंबाळकर गुन्हे शाखा, सहकारी अंमलदार फिरोज तांबोळी, संजय सावळे, स्वप्निल सन्नके, निलेश रोंगे, अभिजित कांबळे तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व मित्र परिवारांकडून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.