करमाळ्याच्या रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी केला भाजपमध्ये प्रवेश ; हे नेते उपस्थितीत
सोलापूर जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाला जोरदार धक्का बसला असून दोन वेळा करमाळा विधानसभा लढवणाऱ्या युवा नेत्या रश्मी बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य नेते व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. बसवराज पाटील, रश्मी बागल यासारख्या नेत्यांमुळे भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, खा. सुधाकर शृंगारे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी उपस्थित होते.