सोलापुरात राम सातपुते यांचा पराभव ; “एका देवेंद्रने आणले दुसऱ्या देवेंद्रने परत पाठवले” ! चर्चेला सुरुवात
सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी 80 हजाराच्या फरकाने विजय मिळवत भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांचा पराभव केला.
आमदार राम सातपुते यांच्या पराभावाची अनेक कारणे सांगता येतील मात्र सोलापुरात पहिल्यांदाच मुस्लिम समाजाने मोठ्याने इरशिने केलेले मतदान हे भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय मर्जीतील आणि जवळचे कार्यकर्ते म्हणून आमदार राम सातपुते यांची ओळख आहे. यंदा भाजप कडून सोलापुरातून स्थानिक आणि ओरिजनल उमेदवार द्यावा अशी मागणी झाली. सोलापुरातील स्थानिक भाजपच्या नेत्यांनी सुद्धा पक्षश्रेष्ठींकडे तीच मागणी लावून धरली परंतु समोर आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार असल्याने त्या उमेदवाराच्या तोडीस तोड, आक्रमक उमेदवार असावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राम सातपुते यांना उमेदवारी दिली.
या निवडणुकीच्या प्रचारात अयोद्धाच्या राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा राहील या दृष्टीने राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली “जो राम को लाये है हम उनको लायेंगे” असे घोष वाक्य होऊन सोलापुरात वातावरण तयार झाले.
राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. त्या सभेमध्ये नुकतेच भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेले माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचे भाषण लक्षवेधी ठरले. त्या भाषणात त्यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करताना खालच्या पातळीवर जाऊन मुस्लिम समाजावर टीका केली, समाजावर अनेक आरोप केले, पण देवेंद्र कोठे यांचे आजपर्यंतचे राजकारण पाहता अनेकांना हे आवडले नाही, त्यामुळे देवेंद्र कोठे यांच्या भाषणाने मुस्लिम समाज चिडला, समाजाने मनावर घेत या निवडणुकीत मोठ्या चुरशीने मतदान केल्याचे पाहायला मिळाले. मुस्लिम समाजातून सुमारे 70 टक्के पेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती समोर आली.
प्रणिती शिंदे यांच्या विजयात सर्वच समाजाचा वाटा आहे पण मुस्लिम, मराठा, मागासवर्गीय, मोची हा एम फॅक्टर भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसून येते. दरम्यान आता “एका देवेंद्रने राम सातपुते यांना आणले आणि दुसऱ्या देवेंद्रने परत पाठवले” अशा चर्चेने जोर धरला आहे.