विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर समाधान आवताडे ; खालून आमदार यशवंत माने यांनी मांडला महत्त्वाचा विषय
सोलापूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांना सभापती यांच्या अनुपस्थितीत तालिका अध्यक्षपदाची संधी मिळाली. शुक्रवारी आमदार आवताडे हे तालिका अध्यक्ष म्हणून सभापतींच्या खुर्चीवर बसले.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी सभापती आवताडे यांच्यासमोर अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. गुरुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावांमध्ये पाण्याच्या डबक्यात पाणी प्यायला गेलेल्या 24 म्हशींचा विजेची वायर तुटून पाण्यात पडल्याने धक्का लागून मृत्यू झाला. हा मुद्दा आमदार माने यांनी उपस्थित करत त्या शेतकऱ्याला बाजारभावाप्रमाणे तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली.