सोलापुरात वडार समाजाची हाक; बांधवांनो, समाजाच्या अस्मितेसाठी मतभेद विसरून एकत्र या
सोलापूर : राज्यातील वडार समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात वडार जन आंदोलनच्या चिंतन शिबिराच्या माध्यमातून राजकिय जोडे बाजूला सोडून एकत्र येण्याची हाक देण्यात आली. वडार समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
सोलापुरात मंगळवार 30 जानेवारी रोजी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात समाजातील सामाजिक कार्यकर्त्या तथा निमंत्रक संगीता पवार यांच्या नेतृत्वाखाली वडार जन आंदोलनची महत्वाची बैठक संपन्न झाली. सुशील बंदपट्टे यांनी पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती.
यावेळी भारत निंबाळकर, बबनराव जाधव, गंगाधर दिंडोरे, बाबुराव धोत्रे, नागेश चौगुले, सुरेश विटकर, डॉ धनंजय निंबाळकर, डॉ बंडगर, श्रीनिवास गुंजी
टी एस चव्हाण, धनवडे, महादेवी अलकुंटे, दयानंद मंठाळकर, मनोहर मुधोळकर, कमालकर मुदूगल यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडार जातीचा समावेश ST किंव्हा SC मध्ये करावा, जातीच्या दाखल्यासाठी १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करणे, देशभर वडार समाज ही जात एकाच प्रवर्गात व्हावी ( ST किंव्हा SC ), वडार जातीसाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण द्यावे, जात निहाय जनगणना व्हावी, वडार जातीच्या सर्वागीण विकासासाठी भरीव तरतूद करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे या समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.
संगीता पवार उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, संपूर्ण महाराष्ट्रात फिरताना असे लक्षात आले की,राजकीय सामाजिक शैक्षणिक, आर्थिक या क्षेत्रात समाज असलेला आहे. समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने अशी कोणतीही शासनाकडून ठोस योजना राबवली गेली नाही. त्यामुळे वडार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी, समाजाला एकत्र करण्यासाठी वडार जन आंदोलन काम करीत आहे.
सुशील बंदपट्टे उपस्थिताना संबोधित करताना म्हणाले, राज्यात वडार समाजाची सुमारे 90 लाख लोकसंख्या असतानाही समाज अजूनही शासकीय लाभापासून वंचित आहे. समाजाचे दोन मोठे मेळावे झाले, समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा झाली पण ती घोषणाच राहिली. समाज हाताने दगड फोडणारा आहे, जेव्हापासून मशीन आल्या तेव्हापासून बेरोजगारी वाढली, युवक व्यसनाधीन झाले, राज्य सरकारने या समाजासाठी किती नोकऱ्या निर्माण केल्या हा प्रश्न आहे म्हणूनच वडार जन आंदोलन या सर्व विषयांवर आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय.