ब्रेकिंग : सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर
सोलापूर : सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघासाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आपल्या 57 उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली. त्यामध्ये सोलापूर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
महाराष्ट्रातील सात उमेदवारांमध्ये प्रणिती शिंदे यांचे सोलापूर साठी नाव आहे.
भारतीय जनता पार्टीने शेवटपर्यंत प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. परंतु आपल्या रक्तात काँग्रेस असल्याचे सांगत प्रणिती शिंदे या ठाम राहिल्या. काँग्रेस पक्षाने त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने आता भाजपला आपला उमेदवार घोषित करावा लागणार आहे.
प्रणिती शिंदे यांनी यापूर्वीच मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये आपला प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा प्रणिती शिंदे यांच्यासाठी प्रचार करताना दिसत आहेत. प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर लोकसभेची ही लढत अतिशय काट्याची ठरणार हे मात्र नक्की.