भाजपने तीनदा निवडणुकीत धूळ चारली आता चौथ्यांदा पराभवाला तयार रहा ; राम सातपुते यांचे काँग्रेसला आव्हान
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सोलापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. मात्र त्यापूर्वी सोलापूर भकास होण्यासाठी कोण जबाबदार आहे याचा विचार काँग्रेसने करावा अशी सडकून टीका भाजपाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोमवारी केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार सातपुते हे सोमवारी प्रथमच सोलापुरात दाखल झाले. यावेळी झालेल्या रोड शो नंतर त्यांनी मार्कंडेय उद्यान येथे कॉर्नर सभेला संबोधित केले.
आमदार सातपुते म्हणाले, सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीची लढाई ऊसतोड कामगाराचा मुलगा विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी अशी होणार आहे. आयुष्यभरासाठी सोलापूरकरांच्या सेवेकरिता वाहून घेण्याचा निश्चय मी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजी साखर कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अशा अनेक साखर कारखान्यांसाठी माझ्या आई-वडिलांनी ऊसतोड कामगार म्हणून काम केले आहे. तसेच मी सध्या माळशिरस तालुक्याचा आमदार आहे. त्यामुळे मी उपरा नसून सोलापूर जिल्ह्यातलाच आहे. परंतु माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर अशा विविध मतदारसंघातून निवडणूक लढवत होते तेव्हा ते उपरे नव्हते का ? असा सवालही आमदार सातपुते यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना केला.
काँग्रेसची सत्ता असताना सोलापूरवरून अक्कलकोटला जाण्यासाठी एक तास लागत असे. परंतु मोदी सरकारच्या कामगिरीमुळे आता अवघ्या वीस मिनिटात नागरिक जाऊ शकतात. ३० हजार विडी कामगारांसाठीची घरांची योजना पूर्ण करून त्यांना चाव्या देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर ही भाजप सरकारच्या काळातच झाले आहे. भाजप सरकारने ३७० वे कलम हटवले आहे.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद असा शब्द प्रयोग केला आहे. आमच्या गळ्यात भाजपाचा भगवा आहे. आजवर तीनदा तुम्हाला निवडणुकीत धूळ चारली आहे. आता चौथ्यांदा पराभवासाठी तयार रहा. भाजपाचा विजय निश्चित आहे. सोलापूरकरांचा सालगडी म्हणून काम करेन, असे आश्वासनही भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, शशिकांत चव्हाण, विकास वाघमारे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते होते.