मोहोळ व पंढरपूर जरी काँग्रेसला लीड दिला तरी सातपुते 70 हजाराच्या लीडने विजयी होणार ; भाजपच्या युवा नेत्याने लावला अंदाज
सोलापूर : संपूर्ण देशाचे लक्ष आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी कडे लागले आहे. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते या दोन युवा नेत्यांमध्ये झालेल्या लढतीकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत त्यापूर्वी अनेकांनी आपापले अंदाज बांधले असून आता भाजपचे युवा नेते अक्षय अंजीखाने यांनी तर राम सातपुते हे 70 ते 80 हजाराच्या फरकाने विजयी होतील असा दावा केला आहे.
शहर मध्य विधानसंभा मतदारसंघात पद्मशाली, मोची व तेलगू भाषिक समाज हा भाजपच्या बाजूने उभा राहिल्याने भाजपला मध्य विधानसभा मतदारसंघात 10 हजार पेक्षा जास्त लीड मिळण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांची सभा ही मध्य विधानसभा मतदारसंघात लीड मिळण्यास कारणीभूत ठरणार असून संपूर्ण निवडणूकीचे वातावरण हे हिंदुत्वावर आल्याने मध्य मतदारसंघात हिंदू समाज हा एकजुटीने भाजप सोबत उभा राहिला आहे. प्रभाग 9, 11, 12, 13, 18 व 22 या मतदारसंघात भाजप चांगले मताधिक्य मिळेल.
दक्षिण विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात जरी चुरस दिसत असली तरी दक्षिण विधानसभेचा शहरी भाग जिथे ग्रामीण पेक्षा जास्त मतदान आहे याठिकाणी जुळे सोलापूर, विजापूर रोड, नीलम नगर, हत्तुरे वस्ती या ठिकाणी भाजपला चांगले मताधिक्य मिळणार आहे.
मोहोळ व पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 2014 व 2019 लोकसभा निवडणुकीत ही काँग्रेसला मताधिक्य मिळाले होते, यामुळे त्या ठिकाणी मिळालेले लीड भाजपला पराभव करण्यासाठी कारणीभूत ठरू शकत नाही मात्र मताचा वाढलेला टक्का व शेवटची तासाभरात झालेले मतदान हे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.
शहर उत्तर विधानसभा हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला असून 1996 ची लिंगराज वल्याळ यांची निवडणूक, 2003 ची प्रतापसिंह मोहिते पाटलांची पोट निवडणूक व 2004 सुभाष बापूंची लोकसभा निवडणुकीत शहर उत्तर मतदारसंघ हा भाजपला कायम मताधिक्य देणारा मतदारसंघ राहिला असून या ठिकाणी 50 हजारांचे मताधिक्य मिळेल असा दावा आहे.
एकूण सोलापूर शहराचा विचार करता तिन्ही मतदारसंघातील शहरी भागात भाजपला 70 ते 80 हजार मताधिक्य मिळणार असून मोहोळ व पंढरपूर मधील काँग्रेसचा लीड हा शहरातील मिळणाऱ्या लीडला तोडू शकणार नाही, 2019 च्या लोकसभेला भाजपचे 2 आमदार होते व यंदा 5 आमदार असल्याने लीड कमी झाले तरी भाजपचा विजय निश्चित असल्याचा अंदाज बांधला आहे.