सोलापूर : मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर या गावात घरासमोर गाड्या का लावल्या म्हणून जातीद्वेषातून 5 दुचाकी वाहने जाळल्याची घटना रविवारी रात्री 9 च्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत 2 जणांना भाजल्याची माहिती मिळत आहे.
सावळेश्वर या गावात एका बौद्ध समाजाच्या घरी मुलीचा रविवारी साक्षगंधचा कार्यक्रम होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नातेवाईक आले होते, त्यामुळे चार चाकी व दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जागा नसल्याने काही वाहने कार्यक्रम असलेल्या घराच्या समोर असलेल्या एका घरासमोर लावण्यात आली. कार्यक्रम सुरू असतानाच आमच्या घरासमोर वाहने का लावली या द्वेषातून पेट्रोल आणून पाच दुचाकी वाहने पेटवून देण्यात आली.
आपल्या गाड्या पेटल्याचे लक्षात येतात दुचाकी चालकांनी विजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात दोघांना भाजल्याची माहिती समोर आली आहे. जाती द्वेषातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांचा मोठा ताफा सावळेश्वर गावामध्ये दाखल झाला ज्यांनी ही वाहने पेटवली त्यांना पोलिसांनी उचलून पोलीस ठाण्यात नेले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे समजले.


















