सोलापूर : जिल्हा परिषदमध्ये पूर्णवेळ अधिकाऱ्यांची परवड होताना दिसत आहे तर प्रभारी अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच सोय झालेली आहे. हे यासाठी की जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांसह महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी तसेच समाज कल्याण अधिकाऱ्यांना वाहने नाहीत, ज्यांच्याकडे वाहने आहेत त्यांना ड्रायव्हर नाहीत. काहीजण स्वतःच्या गाड्यामध्ये झेडपीत येतात. प्रभारी अधिकाऱ्यांचा चांगलाच वट आहे. त्यांना वाहने आहेत, ड्रायव्हर आहेत.
एकूणच जिल्हा परिषदेच्या अशा कामकाजावर बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आठ दिवसात त्यांना जिल्हा परिषदेचे वाहन मिळाले, ते बुधवारी शासकीय वाहनात दिसून आले. अखेर गाडी मिळाल्याने त्यांचा रुबाब वाढल्याचं चित्र पहायला मिळाले.
परंतु त्यांच्या गाडीवर खाजगी चालक दिसून आला. एकीकडे असे चित्र असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषदेमध्ये शासकीय वाहन चालकांचा एक ग्रुप बराच वेळ चर्चा करीत होता. काहींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.
या नाराजीचे कारण विचारले असता समजले की, प्रशासनाने सहा वाहन चालकांची अचानक बदली केली आहे. अचानक असे का झाले याबाबत चर्चा होती. त्यांच्याकडून आणखी एक अशी माहिती मिळाली की, आता अधिकारी सर्रास खाजगी ड्रायव्हर वापरत आहेत. कुलकर्णी यांनी तर चोरी प्रकरणी शासकीय चालकावर ही संशय व्यक्त करत पोलिसांकडून चौकशी केली होती मात्र त्यांचा खाजगी वाहन चालक चोर निघाला असे असतानाही ते परत खाजगी चालक वापरत आहेत याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले.



















