सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात टप्पा अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. हे चित्र जिल्हा परिषदेमध्ये मागील तीन दिवसापासून पाहायला मिळते. माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाला शिक्षकांनी अक्षरक्ष: घेराव घातला आहे. ही गर्दी हटता हटत नाही. त्यातच माजी आमदार दत्तात्रय सावंत हे शिक्षण विभागात असून त्यांनी शिक्षण अधिकारी सुलभा वटारे यांच्यासोबत बराच वेळ झाले बंद खोलीत चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे तर शिक्षकांना बराच वेळ ताटकळावे लागले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी वटारे यांनी टप्पा अनुदान देण्यापूर्वी प्रशालेतील अनेक त्रुटी काढले आहेत त्या त्रुटीमुळे तर सर्वांची तारांबळ उडाली. शुक्रवारी शिक्षण विभागात एवढा गोंधळ उडाला की, पोलिसांना बंदोबस्तसाठी यावे लागले. पोलिसांना ही शिक्षक आवरेना असे चित्र होते.
शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या त्रुटी अशा आहेत की, काही तर रडत आहेत. महादेवराव शिंदे प्रशाला पाकणी येथील तिघा शिक्षकांचा पगार थांबविला आहे. शिक्षिका रुक्मिण राजकुमार वाकडे यांनी सांगितले की,
20 टक्के वेळी मंत्रालयीन स्तरावर आम्ही पात्र झालो, आता 40 टक्के झाल्यावर आमच्या तत्कालीन शिक्षण अधिकारी यांच्या 2013 मधील ऑर्डर या बोगस आहेत असे म्हणतात, यांच्याकडे कागदपत्रे नाहीत,आमच्याकडे आहेत आम्ही काय करायचे? असे म्हणून त्यांना रडू कोसळले.

















