सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये पाणी नसल्याकारणाने परिसरातील शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच उन्हाळा असल्या कारणाने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील उदभवलेला आहे. सध्या तीव्र उन्हाळा असताना देखील पाटबंधारे विभागामार्फत सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये टेल एंडपर्यंत पाणी सोडलेले नाही. या उदभवलेल्या पाण्याच्या प्रश्नी दक्षिण सोलापूर तालुक्याचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांना घेऊन सिंचन भवन, गुरूनानक चौक या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण शेतकरी आक्रमक दिसून आले. अशातच कार्यालयातील शिपायाने आमदार आंदोलनाला बसलेत म्हणून पाण्याच्या बाटल्या घेऊन आल्या तेव्हा “आम्हाला तुमचे पाणी नको’ बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडा” असे म्हणून शेतकऱ्यांनी त्या शिपायाला हाकलून लावले.
या आंदोलनात संदीप टेळे, रामचंद्र बिराजदार, पंडित बुळगुंडे, राजुर सरपंच लक्ष्मण गडदे, औराद सरपंच शांतकुमार गडदे, आप्पासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
आमदार सुभाष देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या कारभारावर तीव्र अशी नाराजी व्यक्त केली. एकीकडे उजनीतून भीमा नदीला पाणी सोडले जात आहे. दुसरीकडे सीना नदीत अजूनही पाणी आलेले नाही. उन्हाळा असल्याने सीने काटच्या शेतकरी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पाणी सोडले जाते मात्र ते दक्षिण तालुक्यात शेवटपर्यंत येतच नाही असे वारंवार आणि जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप केला.


















