सोलापूर लोकसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी द्या ; शिंदे गटाचे पदाधिकारी भेटले मुख्यमंत्र्यांना
सोलापूर,दि.21-सोलापूर लोकसभा मतदारसंघातून
प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली.
शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख मंगेश चिवटे, प्रियदर्शन साठे, अनिता माळगे, प्रियंका पराडे आदींनी वरळी येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.यावेळी या सर्वच पदाधिकाऱ्यांनी वाघमारे यांना सोलापूर राखीव मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.
वाघमारे या उच्चशिक्षित आहेत. सोलापूरच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. हे प्रश्न त्या निश्चितपणे सोडवतील. मोची समाजातून आलेल्या वाघमारे यांचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास त्या निश्चितपणे या मतदारसंघातून निवडून येतील असा विश्वासही या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.
उमेदवारी बाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी या पदाधिकाऱ्यांना दिला.
सोलापूर लोकसभेची जागा भाजपकडे असून उमेदवारी बाबत भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने वाघमारे यांना विचारणा केली होती. तेव्हापासून त्यांचे नाव चर्चेत आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच त्यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे.