सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात शुक्रवारी बराच गोंधळ उडाला. 20 टक्के टप्पा अनुदान प्रस्ताव घेऊन आलेल्या शिक्षकांची गर्दी होती. काहींच्या चेहऱ्यावर आनंद होता तर काहींच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते, दुःख यासाठी शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी यंदा सर्व कागदपत्रे तपासून प्रस्ताव मंजूर केले. त्यामध्ये काही शिक्षकांच्या मान्यता ऑर्डर बोगस असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाणावले.
शनिवारी पत्रकारांनी माध्यमिक शिक्षण विभागात वटारे यांची भेट घेतली. शुक्रवारी झालेला गोंधळ आणि शिक्षकांच्या बोगस ऑर्डर बाबत विचारणा केली. तेव्हा वटारे यांनी मी कोणत्याही बोगस प्रस्तावावर सही करणार नाही.
100 टक्के विद्यार्थी आधार कार्डशी जोडले पाहिजे ही मुख्य अट शासनाची होती. त्यानुसार मी कागदपत्रे तपासणी केली. त्यात त्रुटी आढळल्या. त्यात मी काय करणार, काही शिक्षकांच्या ऑर्डर बोगस म्हणजे त्यावर आवक जावक नंबर दिसत नाहीत. त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे नाहीत, काहीं वर तर सह्याच बोगस वाटतात. या ऑर्डर सन 2013-14 मध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी जगन्नाथ शिवशरण आणि विद्या शिंदे यांच्या कार्यकाळात दिल्या गेल्या आहेत. अशा शिक्षकांचे पूर्वीचे वेतन सुरूच राहणार, अशा प्रकरणात वरीष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेऊन तसेच त्यावेळचे अधिकारी बोलावून पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. असे सांगत पुन्हा त्यांनी कोणतेही बोगस काम करणार नाही यावर ठाम राहिल्या.
दरम्यान पत्रकार जेव्हा दुपारच्या सुमारास माध्यमिक शिक्षण विभागात गेले होते तेव्हा एक पंधरा शर्ट व चष्म्या घातलेला व्यक्ती तिथे कार्यालयात होता, जे कुणी शिक्षक येत होते ते कार्यालयात असलेल्या एकाही कर्मचाऱ्यांना न भेटता थेट त्या व्यक्तीला भेटत होते, तो शिक्षकांच्या कानात काय तरी सांगत होता, पत्रकारांना पाहताच त्याची भंबेरी उडाली. नंतर एका कर्मचाऱ्यांला कोण आहे विचारले असता तो एका शाळेचा मुख्याध्यापक असल्याचे समजले. मुख्याध्यापक असताना सर्व त्यालाच का भेटत होते हा निश्चितच संशयाचा विषय असल्याची चर्चा पत्रकारांमध्ये होती.


















