सोलापूर : राज्याच्या महसूल विभागाने तहसीलदार संवर्गाच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण, मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे, करमाळ्याचे तहसीलदार समीर माने या चौघांच्या बदल्या झाल्या असून त्यामध्ये अमोल कुंभार यांचे सोलापूर जिल्ह्यातच पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांची सोलापूरच्या पुनर्वसन कार्यालयात तहसीलदार पदावर बदली करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड या सोलापुरात बदलीने येत आहेत. त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी जिल्हा कार्यालय येथे नियुक्ती देण्यात आली आहे. कोल्हापुरातील चंदगडचे तहसीलदार विनोद ननावरे पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात येत आहेत तर चंदगडच्या तहसीलदार पदी राजेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे, स्वप्निल रावडे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर च्या तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे, समीर माने हे आजरा कोल्हापूर या ठिकाणी गेले आहेत.
दक्षिण सोलापूर, मंगळवेढा आणि करमाळा या ठिकाणी कुणालाही नियुक्ती देण्यात आलेली नाही. अमोल कुंभार यांनी मागील तीन वर्ष दक्षिण सोलापूर तालुक्याचा तहसीलदार म्हणून काम करताना अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केल्याचे दिसून आले. सुंदर माझे कार्यालय या शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम आपले कार्यालय सुंदर करण्याचा मान दक्षिणचे तहसीलदार अमोल कुंभार यांना जातो. त्याच बरोबर तालुक्यातील तलाठी कार्यालय सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर केल्याचे पाहायला मिळाले.



















