सोलापूर : जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचा उत्साह द्विगुणित झाला. कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच मराठा सेवा संघाच्या वतीने भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या भीम गीतांनी उपस्थिततांमध्ये स्फुल्लिंग चेतले तसेच समाज कल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार व मान्यवरांना संविधान पुस्तिका भेट देण्यात आली.
जिल्हा परिषदेत प्रारंभी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर आवारात असलेल्या संविधान स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या पाच आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना यावेळी गौरविण्यात आले.
डॉक्टर कोळेकर यांनी आपल्या व्याख्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ऊर्जा उपस्थितांमध्ये भरली. आंबेडकरांनी जात निर्मूलनासाठी केलेले कार्य, त्यासाठी घेतलेले कष्ट, महिलांच्या उद्धारासाठी केलेले कायदे याची सविस्तर माहिती आपल्या व्याख्यानात दिली.
आजच्या जयंतीचे प्रमुख आकर्षण असलेले स्वानंद टीचर्स् म्यूझिकल ग्रुप प्रस्तुत भीमगीतांचा कार्यक्रम झाला, ह्यावेळस रुपेश क्षीरसागर, किरणकुमारी गायकवाड, महेश कोटीवाले, आण्णा सुरवसे, आशा प्रक्षाळे व एकनाथ कुंभार आधी शिक्षकांनी विविध भीम गीतांमधून आंबेडकरी विचारांचा जागर केला.
प्रारंभी समाज कल्याण अधिकारी खमीतकर यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















