सोलापूर : महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर शनिवारी सोलापूर शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र ( रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी होत आहे. सकाळी नमाज पठणानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्यार्चा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे. सकाळी शहरातील होटगी रोड वरील प्रमुख ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. यंदा सर्वत्र ईदचा उत्साह दिसून आला, बाजारपेठा फुलल्या होत्या,
काल शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ईद का चाँद मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करून शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी शनिवारी रमजाई ईद साजरी करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार ईदच्या दिवशी सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले होते आलमगीर ईदगाह (होटगी रोड) या ऐतिहासिक शाही ईदगाहवर सकाळी 9 वाजता सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली.
देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सवार्ना खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांना संबोधित करताना शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी, आजची मुलं शिक्षण आणि कुराण पासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
आपल्या मुला-मुलींना शिक्षण आणि कुराण पठणकडे वळविण्याची गरज आहे. शिक्षण हा एकच मार्ग आहे जो आपल्याला समृद्धकडे नेऊ शकेल, आपली उन्नती करू शकेल, तुमची प्रतिष्ठा वाढवेल असे सांगताना त्यांनी आजच्या युवकांना कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता चुकीचे पाऊल उचलू नका या देशाचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे त्यानुसार आपण चालले पाहिजे असे आवाहन केले. आज इस्लाम धर्म बदनाम करण्याचा डाव आपला जात आहे, अल्लाह यांची महिमा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशांपासून सावधान रहा, आपल्या पूर्वजांनी इस्लाम वाचवण्यासाठी खूप कष्ट केले आहेत त्यामुळे कुराण समजून घ्या असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.



















