सोलापूर : ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्हय़ात उळेगावाच्या शिवारात आगमन झाले.
जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, भाजप नेते शहाजी पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, प्रांताधिकारी पडदूने, तहसिलदार राजशेखर लिंबारे, तहसीलदार सैपन नदाफ,गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, नायब तहसिलदार शुभांगी जाधव, सर्कल धनुरे, यांच्यासह इतर मान्यवर व अधिकाऱ्यानी पालखीचे स्वागत केले.
आमदार कल्याणशेट्टी यांनी स्वतः ऐवजी सिध्दाराम म्हेत्रे यांना प्रथम हार घालण्याचा मान दिला. सीईओ स्वामी यांनी सहकुटुंब दर्शन घेतले, सचिन कल्याणशेट्टी व शहाजी पवार यांनी सपत्नीक दर्शन घेतले.
या पालखी सोहळय़ात शिस्तीचे भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले. २६ दिवसांचा पायी प्रवास करीत सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेल्या या पालखी सोहळय़ात पांढऱ्याशुभ्र पोशाखातील ६५० भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. यात तरुणांचा सहभाग उल्लेखनीय आहे.
श्री गजानन महाराजांच्या नामाचा गजर, वीणा, टाळ-चिपळय़ांचा किणकिणाट, मृदंगांचा विशिष्ट ताल आणि घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात भाविक तेवढेच तल्लीन होऊन ‘श्रीं’च्या दर्शनासाठी पुढे येत होते. अग्रभागी मानाचे अश्व आहे. यानंतर श्री गजानन महाराजांची पालखी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे मुक्कामी रवाना झाली.






















