सोलापूर : संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी 2 जून रोजी त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे प्रस्थान झाली. खांद्यांवर भगवी पताका, हाती टाळ, मुखाने विठ्ठलनाम घेत मार्गक्रमण करणारे वारकरी तर डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मंगल कलश घेतलेल्या माताभगिनीं हा वैष्णवांचा मेळा सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील रावगावी दुपारी दोन दरम्यान दाखल झाला.
संत निवृत्तीनाथांसह ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठ्ठलमय वातावरणात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पीएस यशवंत माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. यावेळी रावगावातील ग्रामस्थांनी खंडोबाचा भंडारा उधळून जल्लोष करत पालखीचे स्वागत केले.


















