तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दर्शन आणि सोलापूर दौऱ्याची सध्या सोलापूर मध्ये सर्वत्र चर्चा होत आहे. ते पाचशे गाड्यांच्या ताफयासह ते सध्या सोलापूरकडे निघाले आहेत. परंतु हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शाखेच्या वतीने त्यांच्या पंढरपूर येथील व्हीआयपी दर्शनाला विरोध करण्यात आला आहे. हिंदुराष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे आणि शहर संघटक आनंद मुसळे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध केला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे आषाढी एकादशीला पांडुरंगांच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. येताना 300 गाड्यांचा ताफा घेऊन संपूर्ण मंत्रिमंडळासह दाखल होणार आहेत..
संपूर्ण हिंदुस्थानातील भुवैकुंठ असलेल्या पंढरपूरात आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. हजारो मैलांचा पायी वारी करत वारकरी पंढरपुरात दाखल होतात. तासनतास उन्हात, पावसात उभे राहून पांडुरंगांच्या दर्शनासाठी आतुरलेले असतात. अशा प्रसंगी तेलंगणाहून पंढरपुरात अख्या मंत्रिमंडळासह येणाऱ्या मुख्यमंत्री केसीआर यांना व्हीआयपी दर्शन देणे म्हणजे वारकऱ्यांवर अन्याय आहे.
पायी वारी करत येणारे वारकरीच व्हीआयपी दर्शनाचे खरे हकदार आहेत. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की, आपण यांना व्हीआयपी दर्शन देऊन वारकऱ्यांवर अन्याय करू नये केसीआर हे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दर्शनास न येता वर्षभर यावेत, आमची काहीही हरकत नाही. परंतु भुवैकुंठ असलेल्या पंढरपुरात राजकीय शक्तिप्रदर्शनाच्या हेतूने येणार असाल तर, वारकरी कदापि सहन करणार नाही असा इशारा हिंदुराष्ट्र सेनेने दिला आहे.

















