सोलापूर : सावकारी दाव्यातील रोजनाम्याची नक्कल देण्यासाठी चार हजाराची लाच मागणाऱ्या सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत माडीवाळप्पा नाईकवाडी, वय ४४ वर्षे, पद- वरीष्ट लिपीक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय सोलापूर असे लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचे विरोधात सावकारी दावा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तथा सावकाराचा सहाय्यक निबंधक, सोलापूर यांचेकडे दावा दाखल केलेला होता.
सदर दाव्यास स्थगिती मिळण्यास मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे अर्ज दाखल करण्यासाठी तक्रारदार यांचे विरुध्द दाखल दाव्यातील रोजनाम्याचे नक्कला मिळणेबाबत तक्रारदार यांनी दिनांक २९.०३.२०२३ रोजी अर्ज दिला होता. सदरच्या नक्कला मिळणेसाठी तक्रारदार पाठपुरावा करत असताना लोकसेवक हेमंत नाईवाडी यांनी ४००० रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला. प्र. वि. सोलापूर येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी दिनांक १३.०४.२०२३ रोजी केली असता लोकसेवक हेमंत माडीवाळप्पा नाईकवाडी, पद- वरीष्ट लिपीक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे ४००० रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याची तयारी दाखवली म्हणून लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सदर बझार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे सुरु आहे.
ही कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत कोळी पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना श्रीराम घुगे, पोना नरोटे चालक सुरवसे सर्व ने. अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.


















