2022 मध्ये शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठा भूकंप झाला होता. तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाले. त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात मोठी फूट पडली आहे. आपल्या 30 आमदारांच्या समर्थ भाजप शिवसेनेला जाऊन मिळाले आहेत. काही वेळातच राजभवनावर अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे.
अजित पवार यांच्याकडे पक्षातील 54 पैकी 30 आमदारांच्या समर्थनाचे पत्र आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, आदिती तटकरे यांच्यासह अन्य दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य काही भाजप नेते राजभवनात दाखल झाले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत.




















