सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते, मोची समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचं नुकतंच निधन झालं. सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक म्हणून देखील करण म्हेत्रे यांची ओळख होती. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्यने लोकांनी गर्दी केली होती. सोलापूर जिल्ह्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही करण म्हेत्रे यांचं पार्थिव मोदी स्मशानभूमीच्या दिशेने नेलं जात असताना मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाल्याचं पहायला मिळाले.
सोलापूरमधील सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत हा परिसर येतो. पण गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस कमी पडल्याचं दिसत होतं. गर्दी आणि जनभावना पाहून पोलीस हतबल झाले, करण म्हेत्रेंच्या कार्यालयासमोर संतप्त नागरिक व पोलिसात बाचाबाची झाली मात्र शेवटी पोलिसांनी अडवणूक केली नाही हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं.
अंत्यविधी झाल्यानंतर पोलिसांनी करण म्हेत्रेंच्या अंत्यविधीत सहभागी झालेल्या सुमारे 250 जनांविरोधात गुन्हा दाखल केला, त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, बुरगप्पा म्हेत्रे, हणामांतू जंगम, करेप्पा जंगम, दत्ता आसादे, बाबळेश् भंडारे, विश्वनाथ म्हेत्रे, डॉ प्रसाद, शाम म्हेत्रे, मारुती म्हेत्रे, आनंद पलेल्लू, शाम चन्नेपागुल, देविदास कुमार, सिद्धलिंग म्हेत्रे, हरीश जंगम, अशा सुमारे 250 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, सदर बझार पोलीस ठाण्याचे शिपाई श्रीकांत शशिकांत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे, पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणे, कोणत्याही प्रकारची सुरक्षा न बाळगता, तोंडाला मास्क न लावता इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणे, भारतीय साथ रोग नियंत्रण कायद्याचा भंग करणे असे कलम आहेत.



















