तुमचं मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग शिबीर : दिलीप स्वामी
सीईओ स्वामी म्हणाले, कोरोना झाला म्हणजे काही आभाळ कोसळले नाही, हा साधारण बरा होणारा आजार आहे, जो शंभर टक्के बरा होणारा असून जी भीती तुमच्या मनात बसली, मानसिक तणाव आलंय ते जाण्यासाठी आम्ही यापूर्वी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा घेतली, तुमचं शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी आता योग व प्राणायाम शिबिरे घेत आहोत. केवळ इथेच योग प्राणायाम न करता बरे होऊन घरी गेल्यावर ही प्राणायाम करायची आहेत.



जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या कोरोना रुग्णांसाठी योग व प्राणायाम शिबीराला केटरिंग कॉलेज या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सुरुवात झाली. या शिबिराचे उद्घाटन शनिवारी जिल्हा नियोजन भवनात योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाले, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका व पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने ही शिबिरे यापुढे आता शहर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर मध्ये होणार आहेत. केटरिंग कॉलेजमधील कोविड सेंटरमध्ये सकाळी 7 वाजता या शिबिराचे उद्घाटन झाले त्यानंतर योग समितीच्या महिला राज्य प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी प्रवचन देताना ओम नामाच्या जपाचे महत्व सांगितले. योगासने प्रकारामधून सूर्य नमस्कार, दंडासन, वज्रासन, मांडुकासन, शशकासन, वृष्ठासन त्यानंतर प्राणायाम प्रकारात अनुलोम विलोम, भस्त्रिका, कपालभाती, उच्चाई, भ्रामणी हे शिकवण्यासह याची माहिती देण्यात आली, ती प्राणायाम केल्याने फुफ्फुसे मजबूत होणे, शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, घशाची प्रतिकारशक्ती वाढवणे, श्वासोच्छ्वास सुधारणे असे सांगतानाच समोरच्या रुग्णामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासह कोरोना आजाराची भीती घालवण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी राहुल देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिगम्बर गायकवाड, त्यांची सर्व टीम उपस्थित होती.