सोलापूर : जिल्हा परिषद शाळेतील बरेच शिक्षक शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत असलेबाबत व शालेय वेळेत मोबाईलवर सतत बोलत असलेबाबत नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत. अशा बाबी शाळेत घडणे योग्य नाही. शिक्षक व पालक यांच्या अशा कृत्यांचा बालमनावर विपरित परिणाम होतो. हे टाळण्यासाठी व दशसूत्रीमधील संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र काढून खालील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
१. शाळा व परिसरात शिक्षक अभ्यागत व पालक यांना गुटखा, मावा, तंबाखू, सिगारेट, विडी व तत्सम तंबाखूजन्य पदार्थ वापरण्यास व सेवन करण्यास पूर्णपणे बंदी असेल. २. वर्गात शिकवत असताना वैयक्तिक वापरासाठी व बोलण्यासाठी मोबाईल बंदी असेल. मोबाईलचा वापर फक्त शैक्षणिक कारणासाठी करता येईल.
३. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी संबंधित शाळा मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची लेखी परवानगी शिवाय व अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण विनापरवानगी वरिष्ठ कार्यालयात येऊ नयेत, असे शिक्षक आढळल्यास त्यांची त्या दिवसाची विनावेतन करुन शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल.
४. वरील मुद्दा क्र. १ व २ चे पालन न करणारे शिक्षक व पालक यांचेकडून प्रत्येकवेळी रु. २००/- इतका द्रव्यदंड वसूल करुन ती रक्कम शाळा सुधार खात्यावर जमा करुन ती शाळेसाठी वापरावी. तसेच ३ वेळेपेक्षा जास्त वेळ शिक्षकांनी वरील आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचे शिफारसीसह या कार्यालयास विनाविलंब सादर करावे. दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांना असतील.
५. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर आदर्श शिक्षक आचारसंहितेचे पालन करावे व दशसूत्रीतील मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यामध्ये करावी. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करुन दोषी आढळलेल्या शिक्षकांची माहिती या कार्यालयास तात्काळ सादर करावी.



















