सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स डे या कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगल्या कानपिचक्या दिल्या. कार्यक्रमात कोणाच्याही चेहऱ्यावर उत्साह नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची कळा खाल्ली. कोट्यावधीच्या बिलावर माझ्या सह्या घेता मला सांगितले असते तर बुके मी स्वतः आणलो असतो या शब्दात त्यांनी डॅम वैशाली थोरात यांच्याकडे पाहून संताप व्यक्त केला.
जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी तसेच वेगवेगळे दिवस साजरा केले जातात. हे कार्यक्रम घेण्यामागे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांची वेगळी कल्पना असते. अशा कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगला संदेश जावा ही भूमिका त्यांची राहिली आहे.
एक जुलै रोजी डॉक्टर्स डे होता मात्र त्यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची संपूर्ण टीम आषाढी वारीच्या नियोजनामध्ये गुंतली होती. त्यामुळे हा दिवस स्वामी यांनी शुक्रवारी साजरा करण्याचे ठरवले. दुपारी चारच्या दरम्यान यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होता. व्यासपीठावर तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, डॉक्टर दूधभाते, डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, डॉ शेगार यांच्यासह इतर डॉक्टरांची उपस्थिती होती.
सुरुवातीला धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. धन्वंतरीची मूर्ती ही छोटी होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले हे रिलिव्ह होण्यासाठी धुळे या ठिकाणी गेले आहेत त्यांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम झाला. डॉक्टर बागडे यांचीही धुळे येथे बदली झाली आहे.
यावेळी प्रास्ताविक करण्यासाठी सूत्रसंचालकांनी डॉक्टर बागडे यांना सांगितले त्यांनीही बोलण्यास नकार दिला, त्यानंतर डॉक्टर दूधभाते यांना सांगण्यात आले तेही बोलले नाहीत. तेव्हा चिडलेल्या सीईओ स्वामी यांनी उपस्थित सर्वांनाच झापले. त्यानंतर डॉक्टर पिंपळे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर उत्कृष्ट कार्य केलेल्या डॉक्टरांचा सत्कार सुरू होता तेव्हा केवळ एक गुलाब फूल देण्यात आले. यावरही स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली.
कोट्यावधीच्या बिलांवर माझ्या सह्या घेता साधे मोठे बुके आणता आले नाहीत का? मला सांगितले असते तर मी बुके घेऊन आलो असतो असे म्हणून जिल्हा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्यावर नाराजी व्यक्त केली. आपल्या भाषणात ही स्वामी यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.


















