सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी बुधवारी स्वीकारला. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, मी आठ वर्षे लातूरमध्ये काम केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात लातूर पॅटर्न कशा पद्धतीने राबवता येईल याबाबत मी प्रयत्नशील आहे, माध्यमिक विभागातील प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निपटारा करण्यावर भर राहील असे सांगताना पे युनिटच्या कामांमध्ये तत्परता राहील अशी माहिती त्यांनी दिली.
बुधवारी सकाळी चार्ज घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर शिक्षणाधिकारी योजना सुलभा वटारे यांनी त्यांचा जंगी सत्कार केला. बुकेसह गुलाबाचा भला मोठा हार आणून अंधारे यांना घातला आणि अंधारे यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी पदभार मिळाल्याबद्दल आपल्या मैत्रीणीप्रती आनंद व्यक्त केला.
तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांची बदली झाल्यानंतर त्यांचा चार्ज सुलभा वटारे यांना देण्यात आला, परत तीन महिन्यांनी तोच पदभार महीला व बालकल्याणचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांना मिळाला, त्यांची बदली झाल्याने तो चार्ज उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे.



















