सोलापूर : बेछूट खोटे – नाटे आरोप करून अनेकांची सार्वजनिक प्रतिमा मलीन करणाऱ्या, सर्वांवर शिंतोडे उडवणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ किळसवाणा प्रकार आहे. दुसऱ्यांचे चारित्र्य हनन करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या किरीट सोमय्या याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी, त्याचा निषेध करण्यासाठी, सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी काँग्रेस भावना समोर सोमय्या यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांची प्रतिमा रस्त्यावर टाकून त्याला चपलीने तुडवून निषेध नोंदवला.
काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे व महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान चेतन नरोटे यांनी किरीट सोमय्या यांनी अनेकांना उघडे केलं परंतु परमेश्वराने त्यांना आता या प्रकरणात नागडे केल्याचे सांगत महाराष्ट्रातील महिला वर्गात त्यांच्याविरुद्ध चिड निर्माण झाली आहे त्यामुळे सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली..


















