राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी लक्ष्मी विष्णू चाळ याठिकाणी महिला बचतगटाचा तेजस्विनी महिला उद्योग समूह उभा केला आहे, त्यांच्या पत्नी मंगला कोल्हे यांच्यासह संपूर्ण कोल्हे कुटुंबीय हा उद्योग समूह अत्यंत प्रभावीपणे, झोकून देऊन चालवतो, कोल्हे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आमच्या उद्योग समूहाला एकदा भेट द्यावी अशी विनंती केली होती त्या विनंतीस मान देऊन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शनिवार 14 ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास भेट दिली.
जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन झाल्यावर अत्यंत पारंपारिक पद्धतीने त्यांचे औक्षण करून स्वागत झाले त्यानंतर त्यांनी झाडू, खराटे, उदबत्ती, उद, कापूर, राखी, शोभेच्या वस्तू, घर सजावटीचे साहित्य भांड्याचा कात्या, शेंगा चटणी, पापड या सर्व बनवले जाते त्या युनिटला जाऊन भेट दिली, पाहणी केली, माहिती घेतली. त्यानंतर ते एका गोदामात कुलर बनवले जाते त्या ठिकाणी पाहणी करण्यास गेले तिथे काही मुलं काम करत होती त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण घेतोस का नाही? असे विचारलं असता साहेब, आम्ही नाईट कॉलेज करून या ठिकाणी काम करतो असे त्या मुलांनी सांगताच जिल्हाधिकारी शंभरकर अत्यंत प्रभावित झाले.
केवळ दहा मिनिटे वेळ दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल एक तास वेळ दिला सर्वत्र फिरून प्रत्येक युनिटला भेट देत माहिती घेतली. यानंतर त्यांचा कोल्हे कुटुंबीय आणि तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या वतीने येथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, मला वाटले होते छोटासा बचत गटाचा उद्योग समूह असेल मात्र इथे आल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो एवढा मोठा उद्योग समूह मी माझ्या प्रशासकीय कारकिर्दीत एकदाही पाहिला नाही,
याठिकाणी नाईट कॉलेज करून मुलं काम करतात हे खूप चांगले काम असून या उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हाताला रोजगार मिळवून दिला हे मोठे आदर्शवत काम आहे, कोल्हे यांच्या उद्योग समूहाला यापुढे कोणतीही प्रशासकीय अडचण येणार नाही कायम प्रशासनाचे त्यांना सहकार्य राहील अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली.
























