सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेला मोबाईल टॉवर प्रशासनाला “अवघड जागेचं दुखणं” झाल्याचं चित्र आहे. कुणी पण येतंय अन् टॉवर वर चढून आंदोलन करतंय, शोले चित्रपटातील ही स्टंटबाजी झाली आहे. निश्चितच प्रशासन दरबारी काम होत नसल्याने काही नागरिक वैतागून असे मार्ग अवलंबतात पण काही केवळ प्रसिद्धीच्या स्टंटबाजी साठी हा मार्ग अवलंबला जातो, याची डोकेदुखी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाला होते.
त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या मोबाईल टॉवर वर चढता येऊ नये म्हणून सर्व बाजूचे रस्ते बंद केले, तारेची जाळी बसवली, एक गेट करून त्याला कुलूप घातले, तरीही गेटचे कुलूप तोडून एक शेतकरी मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास टॉवरवर चढला, तो पंढरपूर तालुक्यातील देगावचा रहिवासी होता, सातबारा उताऱ्यावर चुकीच्या केलेल्या नोंदी रद्द करण्याची मागणी होती. ही माहिती मिळताच महसूल कर्मचारी गोळा झाले, यात महत्वाची भूमिका बजावली ती कर्मचारी शंतनू गायकवाड यांनी.
त्यांनी सर्वप्रथम पोलिसांना बोलावले, कार्यालयात जिल्हाधिकारी नव्हते, निवासी उपजिल्हाधिकारी नव्हत्या, अप्पर जिल्हाधिकारी नव्हते, त्या सर्वांना गायकवाड यांनी फोन लावला. नायब तहसीलदार संदीप लटके, चिटणीस विभागाच्या तहसीलदार अंजली मरोड यांना बोलावून घेतले, पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांना फोन केला, अग्निशमन दलाच्या कार्यालयात फोन लावून त्यांना बोलावून घेतले.
शेवटी समजावून अधिकाऱ्यांना फोन वरून बोलून कसे बसे त्या शेतकऱ्यांला खाली उतरवण्यात आले. त्याने टॉवर वरून उडी मारली असती तर ते कुणाला परवडणारे नव्हते, अशा वेळी योग्य प्रकारे महसूल व पोलीस प्रशासनात समन्वय साधून आपल्या ओळखीचा उपयोग शंतनू गायकवाड यांनी करून घेत आपली जबाबदारी चोखपणे बजावल्याचं दिसून आले.
शंतनू गायकवाड हे चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मागण्या समस्यांबाबत ते कायम आक्रमक असतात वेळप्रसंगी कर्मचाऱ्यांसाठी ते प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेतात आंदोलनं, उपोषण करतात. केवळ महसूल कर्मचारीच नाही तर राज्य सरकारच्या विविध कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ते कायम आक्रमक दिसून येतात.

















