सोलापूर जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात चोरून हातभट्टीची निर्मीती होत असून तिची विक्री देखील होत आहे. दारूमुळे गोरगरिबांचे संसार उधवस्त होत असून वेळप्रसंगी काही लोकांना प्राणास देखील मुकावे लागते. यासाठी जिल्हयात सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी “ऑपरेशन परीवर्तन” हे अभियान सुरू केले आहे. यामध्ये सोलापूर जिल्हयात हातभट्टी निर्मीती व विक्री करणारे एकूण ७१ ठिकाणे (Hotspot) हे निश्चीत करण्यात आले असून ही ठिकाणे पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकारी यांना दत्तक म्हणून देण्यात आलेली आहेत.
यामध्ये पालक अधिकाऱ्यांच्या त्या गावातील ठिकाणीवरील अवैध दारूबंदी निर्मीती व विक्री बंद करणे, सदर व्यवसायातील लोकांना परावृत्त करणे, त्यांना दुसरे कायदेशीकर उद्योगाकडे वळवणे, त्यासाठी कर्ज/ शासकीय मदत मिळण्यसाठी मार्गदर्शन करणे अश्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी यामध्ये मुळेगाव तांडा, ता.द. सोलापूर व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भानुदास तांडा, ता. द. सोलापूर हे तांडे दत्तक घेतले असून त्या योजनेमध्ये 4 सप्टेंबर रोजी दोन्ही अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक घेवून दोन्ही तांड्यावरील अवैध हातभट्टी निर्मीती करणारे ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये कारवाई करण्यात आली आहे.
केसेस-199, मुद्देमाल 150 लिटर दारू, 48200 लिटर, रसायन एकूण किंमत 10 लाख 15 हजार 950 रुपये व आरोपी 11
मुळेगाव तांडा येथे छापा कारवाई केल्यानंतर गावातील तरुण मुलांना देखील तेजस्वी सातपुते यांनी हातभट्टी दारूमुळे होणारे दुष्परीणाम व त्यापासून परावृत होण्यासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये सदर गावातील राजू चव्हाण या इसमाने स्वतःची दारूची भट्टी स्वतः जेसीबी मशीनने नाश केली असून यापुढे हातभट्टीची दारू गाळणार नसल्याचे सर्वासमक्ष जाहीर केले.
सोलापूर ग्रामीण जिल्हयातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील अश्या ठिकाणी सर्व पोलीस अधीकाऱ्यांनी कारवाई केली असून सर्वत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुळेगाव व भानुदास तांडा येथील कारवाईमध्ये सर्जेराव पाटील, अरुण फुगे, पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, काजुळकर, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण व इतर अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला होता.
























