करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांची जिल्हा परिषद प्रशासनावर जबर पकड आहे, कुठल्या अधिकाऱ्यांला कुठे आणायचे आणि कुठे पाठवायचे यात सध्या जिल्ह्यातले हे मामा माहीर आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संतोष धोत्रे यांनी पदभार घेतला आहे.
त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माळशिरस तालुक्याच्या गट विकास अधिकारी स्मिता पाटील यांनी ही शुक्रवारी पदभार घेतला, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुदतवाढ मिळाली मात्र त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे सोमवारी सोलापूर शहरात आले होते आमदार संजय मामा हे जिल्हा परिषदेमध्ये आले नाहीत मात्र ते सोलापुरात आल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेमधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या कार्यालयात जाऊन आमदार संजय मामांची भेट घेतली आणि या ठिकाणी आमदार संजय मामा यांनी या तिन्ही नवीन अधिकाऱ्यांचा सत्कार घडवून आणला यावरून अधिकाऱ्यांचे मामा प्रेम दिसून आले.




















