सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे येत्या नऊ ऑक्टोबर रोजी सोलापूर दौर्यावर येत आहेत, यापूर्वी दोन वेळा त्यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला होता. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्या जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेते कार्यालयात मंगळवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.
या बैठकीला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश सचिव लतिफ तांबोळी, जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन धाईंजे, नितीन नकाते, खजिनदार राजेंद्र हजारे, मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, प्रल्हाद काशीद, मनोज साठे, यांच्यासह सर्व तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित होते.
शरद पवार हे नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता सोलापुरात येतील त्यानंतर सोलापूर शहर पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार असून दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे मेळाव्याचे ठिकाण अजून निश्चित करण्यात आले नाही.
दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी शरद पवार यांच्या दौऱ्यात एमआयएम नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती दिली..


















