सोलापूर शहर पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल संजय सावरे यांना बुधवारी आयुक्तालयातील पोर्चमध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही दुर्दैवी घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली.
मृत पोलिस कॉन्स्टेबल संजय सावरे हे आयुक्तालयात ड्रिल मास्टर म्हणून कार्यरत होते. पोलिस भरती झालेल्या नवीन मुलांना ते ड्रिल शिकण्याचे प्रशिक्षण देत होते. त्यामुळे सर्वजण त्यांना मास्तर म्हणूनच ओळखत होते. त्यांच्याकडे पोलिस मुख्यालयातील पोलिसांच्या घरांची देखभाल व सफाई कामगार यांच्यावर लक्ष ठेवून काम करून घेण्याचे काम होते.
काल बुधवारी मास्टर सावरे हे कामानिमित्त पोलिस आयुक्तालयात आले होते. त्यांचे काम झाल्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते आयुक्तालयातील पोर्चमधील माहिती कक्षाच्या समोर आले. चालतानाच त्यांना अचानक हृदविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. तत्काळ तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना पोलिस गाडीतून खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी संजय सावरे यांना मृत घोषित केले.


















