सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग या गावी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विहिरीच्या ठिकाणी स्मारक बांधणीसाठी आनंद चंदनशिवे हे प्रयत्न करत आहेत.
हा विषय जिल्हा परिषदेचा असल्याने त्यांचा मागील अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे त्या ठिकाणी त्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे तसेच अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना सोबत घेऊन भेटी दिल्या आहेत. तसेच शासनाकडून चार कोटीचा निधी या स्मारकासाठी मंजूर करून घेतला आहे मात्र जिल्हा परिषदेला या स्मारकासाठी दहा टक्के वाटा द्यावा लागणार असून त्याच्या पाठपुराव्यासाठी चंदनशिवे जिल्हा परिषदेत आले होते.
यावेळी सुरेश हसापुरे यांनी आपल्या झेडपीतील अभ्यासाचा उपयोग करून तातडीने सूत्र हलवली बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्वरित हा विषय मार्गी लावण्याची मागणी केली सभापती विजयराज डोंगरे यांनी त्वरित जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे अशा सूचना बांधकाम विभागाला केल्या. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे आगमन झाले त्यावेळी हा विषय अक्कलकोट मतदार संघातील असल्याने म्हेत्रे यांनीही लवकरात लवकर काम पूर्णत्वास जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
याच वेळी बोलताना विजयराज डोंगरे यांनी माझ्या सभापती पदाच्या कार्यकाळात सर्वाधिक स्मारकांना मी निधी दिला आहे असे सांगताच हसापुरे यांनी माजी पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनीही तीर्थक्षेत्र विकासाला बराच निधी दिला त्यानंतर दुसरे विजय तुम्हीच आहात असे सांगून आता यापुढे स्वर्गीय आनंदराव देवकते, स्वर्गीय उमाकांत राठोड आणि स्वर्गीय डी एन गायकवाड यांच्या स्मारकाला ही निधी तुम्हीच द्या अशी मागणी केली.
याच वेळी पत्रकारांनी सिद्धाराम म्हेत्रे यांना चंदनशिवे यांना ही काँग्रेसची ऑफर आहे आपणाला काय वाटते असा प्रश्न केला? या प्रश्नावर म्हेत्रे यांनी सूचक उत्तर दिले म्हणाले सर्व पक्षातील नेते माझे चांगले मित्र आहेत त्यात आनंद चंदनशिवे यांचाही समावेश आहे त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, आपण कसे अडवू शकतो.


















