सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या केबिनमध्ये अध्यक्षांचा पीए हा टक्केवारी मागतो, चार कोटींची वसुली कुणासाठी? या जिल्हा परिषदेला स्वर्गीय नामदेवराव जगताप, विजयसिंह मोहिते पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा वारसा आहे, प्रशासनाने त्या पीए ला अद्याप निलंबित का केले नाही? त्यांच्यावर अँटीकरप्शनमध्ये गुन्हा का दाखल केला नाही? पीए सोबत अध्यक्षांवर ही गुन्हा दाखल केला पाहिजे.
जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांच्या वर केवळ ऑडिओ रेकॉर्डिंग वरून मुख्य सचिवांनी थेट निलंबित केले होते मग अध्यक्ष व पीए चा व्हिडीओ रेकॉर्डिंग असताना गुन्हा का दाखल होत नाही. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे कुणासाठी वसुली करत होते?ते त्यांनी संभागृहाला सांगावे,अशी चांगली आणि आक्रमक सुरुवात उमेश पाटलांनी केली मात्र ते लगेच… मग या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत सदस्यांची खरेदी झाली होती का? असा प्रश्न विचारताच अध्यक्ष कांबळे यांना मतदान केलेले सुभाष माने, वसंतराव देशमुख, आनंद तानवडे, सविताराजे भोसले, अण्णाराव बाराचारे, मदन दराडे, अतुल पवार यांनी उमेश पाटलांना जाब विचारला, हा शब्द मागे घ्या, आम्ही मतदान केले म्हणजे आम्ही विकलो गेलो होतो का? यावेळी गोंधळ उडाला, शेवटी उमेश पाटलांना आपला शब्द मागे घ्यावा लागला.
याचवेळी सभापती अनिल मोटे यांनी संतप्त होऊन यामध्ये अध्यक्ष कांबळे प्रमुख आरोपी आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची माझी मागणी आहे माझ्याकडे व्हिडीओ क्लीप आहे,
हे सर्व पाहून टेन्शनमध्ये असलेले अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही, हे सर्व तुमच्यासाठीच चाललंय असे म्हंटल्यावर सर्व सभागृह एकमेकांकडे बघून हसू लागले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अध्यक्ष पीए मोहिते यांच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका मांडली आणि हा विषय थांबला.

















