सोलापूर जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ नवनाथ नरळे यांचा कारभार सध्या मनमानी पद्धतीने सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. पशुसंवर्धन विभागाच्या औषध व लस खरेदीत बराच गोंधळ आहे, औषध खरेदीत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याची माहिती असून जनावरांना खरेदी केलेली औषध जातात कुठे असा प्रश्न ग्रामीण भागातील पशु पालकांमध्ये उपस्थित होतो आहे.
सध्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या पायाचे फ्रॅक्चर झाले आहे, त्यांच्या जागेवर तात्पुरता पदभार घेतलेल्या प्रभारी अधिकाऱ्याने डॉक्टरांच्या बेकायदेशीर बदल्या करून बरीच माया कमावली असल्याची चर्चा पशुसंवर्धन विभागात आहे. विजापूर रोडवरील अंडी उबवणी केंद्र हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे, आपलं बरंच कामकाज नरळे हे तिथूनच चालवतात. त्या ठिकाणी एकही पक्षी सध्या पहायला मिळत नाही विनाकारण काही कर्मचारी नेमणूक देऊन पोसले जात आहेत, आता तर एवढी मोठी जिल्हा परिषद सोडून पशुसंवर्धन समितीची मासिक सभा अंडी उबवणी केंद्रात घेण्यात आली.
यावरून नरळे बोले आणि सभापती अनिल मोटे चाले अशी चर्चा रंगत आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या जनावरांमध्ये लाळ खुरकूत या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे, असे असताना पशुसंवर्धन अधिकारी डॉ नरळे सांगतात आम्ही बारा लाख लसी घेतल्या मात्र त्या कुठे दिल्या, याचा पत्ता नाही,
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी सोमवारी या लाळ खुरकूत आजारावरून पशुसंवर्धन अधिकारी डॉ नवनाथ नरळे यांना चांगलेच फैलावर घेतले होते, जनावरे मेल्यावर तुम्ही लसीकरण करणार का? अशा शब्दात त्यांनी झापले.
सभापती मोटे हे जिल्हा परिषदेत कायम भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात, कठोर भूमिका घेतात, दुसरीकडे त्यांचाच विभाग प्रमुख बनवाबनवी करतो हे नवलच म्हणावे लागेल. एकूणच यावरून ‘नरळे’ यांच्या वरिष्ठांचे ही या विभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय का?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.


















