सोलापूर शहर व जिल्ह्यात काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांची निवडणूक रंगणार असे चित्र आहे. सोलापूर शहर अध्यक्ष पदासह इतर तालुक्यातील अध्यक्ष पदाकडे ही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या भूमिका या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
दक्षिण विधानसभा मतदार संघ युवक अध्यक्ष पदासाठी आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक मंद्रुपचे अनंत म्हेत्रे, महेश जोकारे, रविकांत पाटील, रोहन साठे या चौघात लढत होत आहे. विद्यमान अध्यक्ष अनंत म्हेत्रे याने पक्षाच्या कठीण काळात तालुक्यात युवकांची बांधणी केली आहे, अनेक दिग्गजांनी पक्षाला हात दाखवला असताना अनंत म्हेत्रे हे खंबीरपणे पक्षा सोबत होते, त्याचा एकनिष्ठपणा याची जाण पक्षाच्या वरिष्ठांना आहे. म्हणूनच या निवडणुकीत अनंत म्हेत्रे याचे पारडे जड असल्याची चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
शेवटी निर्णय हा आमदार प्रणिती ताई यांच्यावर सोपवण्यात आला आहे. तालुक्यात पक्षाचे काम, युवकांमध्ये असलेली ओळख, संघटन बांधणी तसेच युवा कार्यकर्त्यांची नोंदणी, मतदान पाहून प्रणिती ताई या येत्या 20 नोव्हेंबर रोजी निर्णय घेऊन पुढील आदेश देणार असल्याची माहिती मिळाली. एकूणच ही निवडणूक पक्षांतर्गत गटबाजीमुळे चांगलीच रंगतदार होणार यात शंका नाही.


















