सोलापूरची आगामी महापालिका निवडणूक केवळ दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सोलापूरचे राजकारण तापू लागले आहे. या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस पक्ष, एमआयएम या प्रमुख पक्षांमध्ये लढती अपेक्षित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जुबेर बागवान यांनी सध्याच्या प्रभाग 14 मधून आपले बंधू हारीस बागवान (हाजीसाब) यांना उतरवण्याची तयारी केली आहे.
त्यासाठी जुबेर बागवान यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जुबेर बागवान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पक्षांमध्ये आपली स्वतंत्र छाप निर्माण केली आहे, मागील तीन ते चार वर्षात पक्ष वाढीमध्ये त्यांचाही मोठा सहभाग पाहायला मिळतो, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अत्यंत जवळचे समर्थक म्हणून जुबेर बागवान यांच्याकडे पाहिले जाते त्याचेच बक्षीस म्हणून बागवान यांना जिल्हा नियोजन समितीवर सदस्य पद मिळाले .
दरम्यान सध्याच्या प्रभाग 14 मध्ये काँग्रेसचे तोफिक हत्तुरे एमआयएम पक्षाचे रियाज खरादी हे विद्यमान नगरसेवक आहेत ते सुद्धा आपल्या पक्षाकडून इच्छुक असणार आहेत. एमआयएमचे नेते शहर अध्यक्ष फारुक शाब्दी यांनी आपले बंधू मुस्तफा शाब्दि यांच्यासाठीही हाच प्रभाग निवडलेला आहे. यावरून सर्वाधिक मुस्लिम मतदार असलेल्या सध्याच्या प्रभाग 14 वर सर्वच पक्षातील मुस्लिम नेत्यांची नजर आहे त्यामुळे ही निवडणूक निश्चितच तगडी राहणार यात कोणतीही शंका नाही.
















