सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर पातळीवर युवक कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊ नये म्हणून समन्वयाने पदे जाहीर करत यापुढे त्याच कार्यकर्त्याला मतदान करण्याच्या सूचना केल्या आहेत.
आमदार प्रणिती शिंदे यांचा शब्द अंतिम मानत कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र आमदार प्रणिती शिंदेंनी घेतलेल्या निर्णयाला पक्षांतर्गत विरोध होताना दिसत आहे. माजी जिल्हा प्रवक्ते बसवराज बगले यांनी थेट आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदेच्या निवडीला आव्हान दिले आहे.
आमदार प्रणिती ताईंना युवक पदाधिकारी निवडीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का? काँग्रेसचे प्रसिद्ध झालेले पत्र बोगस आहे, फेक आहे, निवडणूक प्रक्रिया व मतदार नोंदणी 12 डिसेंबर पर्यंत असताना ती प्रक्रिया मध्येच थांबविण्याचा अधिकार प्रदेश कार्याध्यक्षांना आहे का? निवडणूक नियमांचा भंग करण्याचा अधिकार त्यांना आहे का? दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता उमेदवारी कशी जाहीर केली? असे थेट प्रश्न बसवराज बगले यांनी उपस्थित केले आहेत. ते सोलापुरात आलेल्या निरीक्षकांना जाब विचारणार होते.
दरम्यान सोलापुरात कुणाल राऊत आणि प्रणव पाटील असे उघड दोन गट तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी कुणाल राऊत आणि प्रणव पाटील या दोन्ही युवा कार्यकर्त्यांना मतदान करण्याचे उघडपणे आवाहन सर्व सोलापुरातील कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र बसवराज बगले यांच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना या निवडीमध्ये हस्तक्षेप झाला हे पटत नाही असे त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून दिसून येते.


















