सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सोलापूरचे सिव्हिल हॉस्पिटल. हे हॉस्पिटल म्हणजे गोरगरीब वंचितांसाठी आरोग्यदायी आहे. याच सिव्हील हॉस्पिटल मध्ये कोरोनाच्या हजारो गोर गरीब रुग्णांचे जीव वाचवले. एकीकडे सिव्हिल हॉस्पिटलचे असे नाव असताना दुसरीकडे मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा कायमच आरोप होत आला आहे.
सिव्हील हॉस्पिटलला 3 मोठे प्रवेशद्वार आहेत मात्र आता डॉक्टर ठाकूर यांनी दोन प्रवेशद्वार बंद केले आहेत. केवळ एकाच प्रवेशद्वारामधून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रवेश मिळत आहे. आता तर अशी माहिती समोर आली आहे की, दुचाकी वाहनांना सिव्हील हॉस्पिटल मध्ये प्रवेश बंदी केली जाणार आहे. त्याचबरोबर रिक्षांना सुद्धा निर्बंध घालण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दुचाकी वाहनांची साठी पार्किंग सध्या ओपीडी समोरच्या बाजूला आणि बी ब्लॉकच्या डाव्या बाजूला सोय आहे. परंतू आता या दोन्ही पार्किंगच्या जागा बंद करण्यात येणार असून सिव्हिल हॉस्पिटल समोरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मोकळी जागा स्वच्छ करण्यात येत असून त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असल्याचे समजते.
सिव्हील हॉस्पिटलचा परिसर अतिशय मोठा आहे. काही नागरिक दुचाकीवर ही रुग्णांना घेऊन जातात मग बाहेर गाडी पार्क करून रुग्णांना आत मध्ये रस्ता ओलांडून चालत कसे घेऊन जायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन मोठे गेट बंद केल्याने एकाच गेट समोर प्रचंड गर्दी होत असून त्या प्रमुख रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उत्तर तहसीलदार कार्यालय समोरील गेट उघडे करण्याची मागणी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आहे त्याकडेही जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जाते. यावरून अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांचा मनमानी कारभार या प्रकरणांमध्ये दिसून येतो. त्यांच्या या निर्णयाबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजीचा सूर समोर येत आहे.
ए ब्लॉक आणि जुन्या दगडी बी ब्लॉकच्या इमारती समोर असलेली मोकळी जागा जी पूर्वी बगीच्या होती, त्याठिकाणी प्रशस्त पार्किंग केले तर निश्चित सर्वांची सोय होईल अशी ही मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.

















