सोलापूर : सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता महापालिकेवर असल्याने या भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्व विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र सर्वांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर भारतीय जनता पार्टीचा फायदा होईल असाही सूर सर्वपक्षीय नेत्यांनी मधून आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतल्याने आघाडी होणार का? हा मोठा प्रश्न सोलापुरात आहे. याच पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आडम मास्तर यांनी गुरुवारी आपल्या कार्यालयात एका विषयी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात पक्षाची रणनीती काय? असा प्रश्न केला असता त्यांनी भारतीय जनता पार्टीला महानगरपालिकेच्या सत्तेतून खाली खेचण्यासाठी सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एकत्र येऊन जर पूर्ण ताकतीने निवडणूक लढवली तर निश्चित त्याचे परिणाम चांगले येतील अशी भूमिका मांडली.
याचवेळी पत्रकारांमधून काँग्रेसचे नेतृत्व आपणाला सोबत घेईल का? या प्रश्नावर मात्र आडम मास्तर यांनी जर काँग्रेसच्या नेतृत्वाने आघाडीसाठी पुढाकार घेतला तर निश्चित आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत सहभागी होऊ असे सांगून आडम मास्तर यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे.
एकीकडे आडम मास्तर असे म्हणत असताना दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे यांच्या ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी पहिल्यांदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महापालिकेत आघाडी करण्याच्या गप्पा मारल्या यावरून आता सोलापूर शहरात चर्चेला ऊत आला आहे.
















