सोलापूर ः बहुजन हक्क शिक्षक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी तडवळ येथील जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महांतेश्वर हणमंतराव कट्टीमनी यांची एकमताने निवड करण्यात आली.
सोलापूरच्या शासकीय विश्रागृहात झालेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांनी ही निवड केली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. महांतेश्वर कट्टीमनी यांनी स्वत: व पत्नीचे पीएफ मोडून जेऊर, गौडगाव बु॥ व नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवून आणला आहे.
योग्य नियोजन आणि दूरष्टीमुळे नागणसूर कन्नड शाळेचे सुशोभिकरणही त्यांनी केले आहे. पूर्वी या शाळेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. शाळेची इमारतही मोडकळीस आली होती. त्याला रंगरंगोटी करुन त्याचे दारिद्रय दूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन हे कार्य सिद्धीस नेले. गुणवत्तेमुळे ही शाळा जिल्ह्यात आघाडीवर असून, शिष्यवृत्तीसह क्रीडामध्ये जिल्हा व तालुकापातळीवर शाळेने नाव कमविले आहे. सहकारी शिक्षकांना अनेक आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाले आहेत. अनेक विद्यार्थी चांगल्या हुद्यावर कार्यरत आहेत.
गुणवत्ता वाढ, पर्यावरणयुक्त शाळा, स्वच्छता, आरोग्य संपन्न शाळा हा उपक्रम त्यांनी राबविला आहे. यावेळी शहराध्यक्ष राजू चव्हाण, बहुजन हक्क संघटनेचे शहराध्यक्ष कीर्तीपाल घोडकुंभे, कार्याध्यक्ष मोहन थळंगे, सरचिटणीस सचिन पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

















