सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी मागील पावणे दोन वर्षांमध्ये पालकमंत्रिपद सांभाळताना अनेकांना आपलं केल आहे. भले त्यांचा ओढा एका विशिष्ट समाजाकडे असला तरी काँग्रेस पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, शिवसेना असेल, की एमआयएम असेल अशा सर्वच नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,किंवा जिल्ह्यातील पदाधिकारी असतील त्या सर्वांना आपल्या स्वभावामुळे त्यांनी जवळ केले आहे. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे असेच एमआयएमचे तौफिक शेख आणि त्यांचे समर्थक नगरसेवक.
महाविकास आघाडीच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस ‘पॉवरफुल्ल’ आहे.त्याचा परिणाम सोलापूरात दिसून येतो, अनेक मोठे नेते राष्ट्रवादीत गेले असून काही बडे नेतेही वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा हे सोलापूर दौऱ्यावर होते, एमआयएम नगरसेवक तौफिक शेख आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी मोठा कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमाला काँग्रेस नगरसेवक बाबा मिस्त्री हे सुद्धा हजर होते, यापूर्वी कोरोना काळात सिव्हील हॉस्पिटलच्या विषया संदर्भात पालकमंत्र्यांवर तोंडसुख घेतले होते, तोच धागा पकडून पालकमंत्र्यांनी बाबा मिस्त्री यांना “मला ओळखले नाही तुम्ही” बाबा, मी तुमच्या सख्ख्या मामा पेक्षा चांगला मामा आहे.असे सांगून बाबा मिस्त्रीं वर एक प्रकारची जाळे टाकले.
तौफिक शेख यांचं वेगळं प्रस्थ नई जिंदगी भागात तयार झालंय, शेजारी समाज बांधव बाबा मिस्त्रींची सुद्धा या भागात स्वतंत्र ओळख आहे, जनमानसात छाप आहे. आगामी महापालिका निवडणुकीत जर राष्ट्रवादी काँग्रेस कडून हे दोन्ही नेते एकत्र आले तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचे वजन वाढणार आहे. मात्र बाबा मिस्त्रींची ओळख ही काँग्रेस म्हणूनच आहे, त्यामुळे बाबा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करणे शक्य नसल्याचे बोलले जाते.
येणाऱ्या 12 डिसेंबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असून एनसीपीच्या गळाला कोण कोण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















