सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील हे कायमच हटके करण्यामध्ये माहीर आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा वाढदिवस साजरा होत आहे. हा वाढदिवस यंदा मोठ्या जल्लोषात उत्साहाने साजरा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी साहेबांना शुभेच्छा देण्याची संधी सोडली नाही ते थेट दिल्लीला गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी साहेबांना ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांचे कट्टर समर्थक बालाजी पवार व मनोज साठे हे दोन नेते मंडळी उमेश पाटलांच्या सोबत होते.
यापूर्वी काका साठे यांचे सर्वच कार्यकर्ते उमेश पाटील यांना पाण्यात बघत होते ही दूरी काहीशी कमी झाली असली तरी अजूनही काका साठे हे मोहोळच्या मालकांसोबत असल्याने उमेश पाटलाचं तितकं जमत नसल्याचे चित्र आहे. अशात दोन जवळचे कार्यकर्ते थेट उमेश पाटलां सोबत जाऊन साहेबांना शुभेच्छा देतात यावरून उमेश पाटलांचा राजकीय वजन वाढल्याचं पाहायला मिळतं.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात उमेश पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. यंदा जिल्हा परिषदा ताब्यात घेण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी ज्या पद्धतीने महापालिका निवडणुकीची जबाबदारी महेश कोठे यांच्या वर देण्यात आली तशी जिल्हा परिषदेची जबाबदारी अजूनही कुणावर दिली गेल्याच दिसतं नाही.


















