सोलापूर : सोलापूर अक्कलकोट रोडवर महापालिकेच्या अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू असून जुनी लाइन व नवीन लाईन जोडण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी या ड्रेनेज चेंबर मध्ये काम करताना चार कामगार एकमेकाला वाचवायला जाताना एकापाठोपाठ आत पडले. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. दोघांची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर सध्या संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त पी शिवशंकर व अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची पाहणी केली यानंतर माहिती देताना आयुक्त शिवशंकर यांनी, अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू होते तिथे ही घटना घडली आहे. याची संपूर्ण चौकशी करणार असल्याचे सांगताना निश्चित दोषी मक्तेदारावर कारवाई करणार अशी माहिती शिवशंकर यांनी दिली.
अशा घटना सोलापूर शहरांमध्ये अनेक वेळा घडल्या असून अनेक सफाई कामगारांचा मृत्यू झालेला आहे. सफाई कामगार किंवा ड्रेनेज लाईनचे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही.

















