सोलापूर :- प्रति वर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबत च्या माहितीचा अधिकार, उत्पादन निवडीचा अधिकार व तक्रार निरसन करून घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. या कायद्यामुळे ग्राहकांना मिळालेले अधिकार हे ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरी या अधिकाराबाबत ग्राहक म्हणून प्रत्येक नागरिकांनी अधिक जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले.
शिवछत्रपती रंगभवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, साहयक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदस्य भालचंद्र पाठक, दिपक इरकल, हरिदास, महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत परिषदेच्या सदस्या शोभना सागर, ॲड. आनंद सागर, भैरवनाथ कानडे तसचे अन्य मान्यवर उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी पवार पुढे म्हणाल्या की, आजचा हा राष्ट्रीय ग्राहक दिन हा ग्राहक शक्तीची ग्राहक हिताची जाणीव करून देणारा आहे. या कायद्याच्या संरक्षणामुळे ग्राहक हिताची जोपासना होण्यास मदत मिळत आहे. शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक ग्राहकापर्यंत या कायद्याबाबत जनजागृती होऊन प्रत्येक नागरिक आपल्या हक्कासाठी व आपली फसवणूक होऊ नये यासाठी जागरूक राहिला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.
ग्राहक पंचायत सदस्य महाराष्ट्र राज्याच्या सदस्या श्रीमती सागर यांनीही राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व सांगून प्रत्येक नागरिकांनी आपल्या हक्काबाबत सजग राहिले पाहिजे व ग्राहक हक्काची माहिती इतरांना पर्यंतही पोहोचवली पाहिजे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास संबंधित ग्राहकाने तात्काळ तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
शाहीर खाडे यांनी पथनाट्य व पोवाड्यातून ग्राहक संरक्षण परिषद व राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व उपस्थित नागरिकांना पटवून दिले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक शक्तीची व ग्राहक हिताची जाणीव करून देणार्या विविध शासकीय विभागाच्या प्रबोधनात्मक माहिती स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या अनुषंगाने ग्राहक संरक्षण कायद्याची ग्राहकांमध्ये जनजागृती साठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी प्रास्ताविकात दिली. तसेच ग्राहक दिन आयोजित करण्याचा उद्देश ही त्यांनी सांगितला. तरी या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सहाय्यक पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रसाद सोनवणे यांनी केले.


















