आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम व सुशासन सप्ताहाचे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहूउद्देशिय सभागृहात शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रायोगिकतत्वावर संबंधित लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी शमा पवार, तहसिलदार महसूल दत्तात्रय मोहोळे, तहसिलदार दक्षिण सोलापूर अमोल कुंभार तसेच शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या कोरोना लसीकरण चालू आहे. कोरोनाचा नवीन विषाणू ओमीक्रोन ची संख्या दिवसेंदिवस राज्यात इतर जिल्ह्यात वाढत आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्याचे 100% लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरण न करणाऱ्या मध्ये 18 ते 45 वयोगटातील संख्या जास्त आहे तरी सर्व संबंधित पात्र नागरिकांनी आपले 100% लसीकरण करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा दुष्परिणाम फारच भयानक असल्याने ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी लस घेणे खूपच गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण झाल्यास पुढील काळात येणारे संभाव्य धोके आपणास टाळता येतील. जिल्हा प्रशासनाकडून आता जी व्यक्ती कोरोना बाधीत होईल त्यांना तात्काळ कॉरंटाईन केले जाईल. कोणत्याही कोरोना बाधीत व्यक्तीला घरामध्ये उपचार घेता येणार नाहीत. तरी सर्व नागरिकांनी आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांना लसीकरणाचे महत्व सांगून ज्यांचे लसीकरण झाले नाही अशा व्यक्तींना लसीकरण करून घ्यावयास सांगावे. सर्व नागरिकांनी लस घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही शंभरकर यांनी यावेळी केले.
तसेच यावेळी प्रायोगिकतत्वावर नागरिकांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. यामध्ये शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटूंबलाभ योजना लाभ, डिजीटल 7/12 इत्यादींचे वाटप जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.

















