सोलापूर : मला न मागता सभापतीपद दिले, कारभार व्यवस्थित चालत असताना अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात अपयशी झाले, आता चौकशीचे कारण पुढे करून राजीनामा देण्यासाठी जोर लावला जात आहे मात्र कितीही चौकशी झाली तरी चालेल आता कदापिही राजीनामा देणार नाही, हे जे चाललंय ते योग्य नाही अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर व्यक्त केली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गैरकारभार प्रकरणी चौकशी करण्याची मागणी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे, त्याची चौकशी सहकार मंत्र्यांनी लावली असून लेखापरीक्षक डोके हे चौकशी करणार आहेत. एकूण 36 मुद्द्यांवर तक्रार करण्यात आली असून त्याची चौकशी केली जाणार आहे.
तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना शह देण्यासाठी त्या वेळचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत एकत्र येऊन त्यांनी निवडणूक लढवली सहकारमंत्र्यांना धूळ चारण्यात त्यावेळी सर्व नेते यशस्वी झाले. एक वर्ष दिलीप माने यांना सभापती केल्यानंतर दुसऱ्या वर्षी मात्र बाळासाहेब शेळके यांचे नाव समोर होते परंतु विजयकुमार देशमुख यांना न मागता सभापती करण्यात आले.
आता जवळजवळ विजयकुमार देशमुख यांचे दोन वर्ष उलटून गेले आहेत तरीही देशमुख हे राजीनामा देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न झाला मात्र देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे असतानाही त्यांच्या पाठीशी बाजार समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे संचालक पाठराखण करत असल्याने देशमुख बिनधास्त आहेत.
आता बाजार समितीमधील गैरकारभार प्रकरणाची चौकशी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार विजयकुमार देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पत्रकारांनी त्यांना या विषयी छेडले, ते म्हणाले,
मुळात तक्रारी मधील जे मुद्दे आहेत ते यापूर्वीचे आहेत काय चौकशी व्हायचे ते होऊ दे मला घाबरायचे कारण नाही, मी माझ्या संचालकांची बैठक घेऊन चर्चा केली असता सर्व संचालक माझ्या पाठीशी आहेत राजीनामा अजिबात द्यायचा नाही असा सूर या वेळी व्यक्त झाला. जे काही राजकारण चालले ते बरोबर नाही, प्रेमाने बसून बोलता येते, चर्चा करता येते परंतु मी सगळ्यासाठी खंबीर आहे मला काहीही फरक पडणार नाही या शब्दात देशमुख यांनी विरोधकांवर तोफ डागली.


















