सोलापूर : फुलांनी सजलेलं कार्यालय…,सर्वत्र रंगरंगोटी.., हिरवागार परिसर.., प्रसन्न कौटुंबिक प्रशासकीय वातावरण…’ हे चित्र होतं, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाचे.
सुंदर माझे कार्यालय अभियानाअंतर्गत दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाचे सुशोभिकरण झुआरी सिमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार राजशेखर लिंबारे, झुआरी सिमेंट प्लांट हेड दीपक कक्कड, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, नायब तहसिलदार शुभांगी जाधव, नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड, नायब तहसीलदार मोहरिर, कंत्राटदार सुनील जाजू,यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या दक्षिण तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा, पुरवठा विभाग, स्वच्छता गृह, अंतर्गत कार्यालयाचे सुशोभीकरण, अभिलेख गृह तसेच वरच्या मजल्यावर असलेल्या आदिवासी विभागाच्या कार्यालयाची पाहणी केली. जेव्हा ते तहसीलदार अमोल कुंभार यांच्या कार्यालयात आले कार्यालय पाहिल्यानंतर त्यांच्या तोंडून “अरे बापरे… हे तर मंत्र्यांचे चेंबर वाटते….., खूपच सुंदर” असे शब्द निघाले…
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या सुशोभिकरणाचे कौतुक तर केलेच मात्र आता स्वतंत्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम तयार करा कोणीही यापुढे मोबाईलवर दिसता कामा नये अशा सूचना करत सुंदर आणि स्वच्छ कार्यालया प्रमाणे नागरिकांना सेवा ही चांगल्या पद्धतीने द्या असे आवाहन केले त्याच बरोबर झुआरी सिमेंट कंपनीच्या सामाजिक दायित्वाचे कौतूक केले.
तहसीलदार कुंभार यांनी सुशासन संकल्पना व सुंदर माझे कार्यालय अभियानाची माहिती देताना पूर्वीचे कार्यालय आणि आताचे कार्यालय पाहून समाधान वाटते, याच श्रेय सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे याना दिले,केवळ सुंदर कार्यालय करून थांबणार नाही तर प्रशासन पारदर्शक आणि गतिमान करण्यावर भर राहील असे ते म्हणाले….



















